त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ बंदला वाशिममध्ये हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक

वाशिम: गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळं असतानाच आता वाशिममध्येही तशीच घटना घडली. वाशिमच्या कारंजा जिल्ह्यात असलेल्या मुस्लिम बहुल भागातली दुकानं पूर्णपणे बंद होती. मात्र वाशिममध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी त्यांची दुकानं बंद ठेवली नव्हती. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागलं.

बंद करणाऱ्या आंदोलकांनी ज्या लोकांनी दुकानं बंद ठेवली नव्हती त्यावर दगडफेक केली. त्यामुळे काही दुकानांच्या काचा फुटल्या. तसंच इतर साहित्याचंही नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातले व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

अमरावतीत 144 कलम लागू, दंगानियंत्रक पथके तैनात

कालपासून अमरावती शहरात सुरु असलेल्या जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केला आहे. 144 कलम लागू असलेल्या परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तत्काळ अटक करू शकतात. या प्रकरणी वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

दरम्यान, अमरावतीत दोन गटातील वादाला हिंसक वळण मिळाल्यामुळे शहरात दंगानियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला तरीही उर्वरीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!