देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय, हुकूमशाही वृत्तीचे मोदी सरकार झुकले; नाना पटोलेंचा हल्लाबोल
मुंबईः उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीती, देशातील बळीराजच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाला आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे देशाताली शेतकऱ्यांना भांडवलदाराचे गुलाम बनवणारे होते. एमएसपीचे प्रावधान या कायद्यात नव्हते. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संपुष्टात येऊन ही बाजारपेठही खासगी व्यापाऱ्यांच्या घशात घालणारे कायदे होते. हे काळे कायदे रद्द करावेत म्हणून देशभरातील बळीराजाने आंदोलन छेडले.
या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस पक्ष पहिल्यादिवसापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करून काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी केली होती. तसेच प्रदेश काँग्रेसने ६० लाख शेतक-यांच्या सह्यांचे निवदेन राष्ट्रपतींना पाठवले होते.
पटोले म्हणाले की, एक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसेल आहेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शेतकऱ्यांना एकदाही भेटण्यास वेळ मिळाला नाही. या शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. जवळपास 700 शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान प्राण गमावले. दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या, कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचा मारा केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलजीवी म्हणून भाजपाने हिणवले. मात्र, शेतकरी मागे हटला नाही. आजचा निर्णय हा या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, देशातील जनतेच्या निर्धाराचा आहे. एकजुटीने लढा दिल्यास सत्ताधारी कितीही शक्तीशाली असले तरी त्यांना झुकावेच लागते हे आज बळीराजाने दाखवून दिले आहे.