पुण्यात दोन नव्या मेट्रो मार्गिकांना मंजुरी… चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचे मानले आभार

पुणे : महायुती सरकारने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी, नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मेट्रोचे जाळे आणखी विस्तारणार असून, प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
पाटील म्हणाले कि, मोदी सरकारच्या भक्कम पाठबळामुळे आणि महायुती सरकारच्या मजबूत नेतृत्वाखाली पुणे मेट्रोचा विकास झपाट्याने होत आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, मेट्रो पुण्यातील दळणवळणाचे महत्वाचे साधन ठरत आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्यासाठी, पुणेकरांच्या प्रगतीसाठी हा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार तसेच महायुती सरकारचे पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.
पुण्यामध्ये सध्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड ही मार्गिका आणि वनाज ते रामवाडी ही अन्य मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. आता सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो तीन मार्गिकेचे काम सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वारगेट ते कात्रज या मेट्रो विस्तारालाही मंजुरी दिली आहे. सोमवारी मंजूर करण्यात आलेल्या मार्गिकांची एकूण लांबी ३१.६३ किमी आहे. या मार्गावर २८ स्थानके असणार आहेत. या मार्गिकांची उभारणी महामेट्रोतर्फे करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने नऊ हजार ८१७ कोटी १९ लाख रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.