कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेत चर्चेविना मंजूर

मुंबई: आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक सादर करण्यात आलं. तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक पटलावर सादर करताच विरोधकांनी मोठा गोंधळ केला. ​त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मांडल्यानंतर लोकसभेने शेती कायदे रद्द करण्याचे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. लोकसभेने कोणतीही चर्चा न करता शेत कायदे निरसन विधेयक, २०२१ मंजूर केले. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती.

“कृषी कायद्यासंदर्भातील सर्व घडामोडी देशवासियांना माहिती आहेत. मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र हृदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत उणीव राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाप्रमाने असलेलं सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही.

आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलोय की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल”, अशी घोषणा मोदी यांनी केली होती. त्यानुसार आज संसदेत कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पार पडली.