महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांना आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा खाली आलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच डेल्टा आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला गेला आहे.
तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात काही मंत्री व आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू केली जाऊ शकतात असे संकेतही पवार यांनी दिले आहेत.
अजित पवार म्हणाले की, कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना नियमावलीचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पालन करायला हवे आहे. अधिवेशन पाच दिवस चालले त्या काळात तब्ब्ल १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाच संसर्ग झाला. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे व्हावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्गाचा वेग पूर्वीपेक्षा जास्त आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्याने सरकार प्रयत्न करत आहे. आतापासून नियम कडक का असा आग्रह करू नये असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.