ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली ते आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत; रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला
जामखेड: ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, त्या आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत! दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ; मात्र भ्रष्टाचाऱ्यायांनी आम्हाला हिशेब मागू नये, असा टोमणा राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपाच्या चित्रा वाघ यांना मारला.
रुपाली जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सभेत बोलत होत्या. या सभेत जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काका वाळुंजकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मधुकर राळेभात, सभापती सूर्यकांत मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले उपस्थित होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्यात, आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडचा विकास केला. दोन वर्षांत अनेक कामे केली. गुंडांनादेखील लगाम लावला. महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशी स्वप्ने विरोधकांना रोजच पडत आहेत. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे ज्यांना माहीतच नाही, त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. जो जास्त खोटे बोलेल, त्यालादेखील पद्मश्री पुरस्कार दिला जाईल.