“कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका

मुंबई: एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गेले काही वर्ष काँग्रेस सोबत राहिल्याने मी सांगू इच्छितो की येत्या दोन-तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. राहुल गांधी कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही. तुम्हाला कोणाला ते माहिती असतील तर मला सांगा, असा घणाघात ओवेसी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

गेली काही वर्षे काँग्रेससोबत राहिल्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की, आगामी दोन ते तीन वर्षात काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच कोण आहेत राहुल गांधी? मी ओळखत नाही. तो कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा, असा खोचक टोलाही लगावला. आम्हाला प्रत्येक पक्षाची बी-टीम म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना इथे बोलावले, तर ते भाजपासारखीच भाषा बोलतील आणि तशीच भाषा अखिलेश यादवही बोलतील, असे ओवेसी म्हणाले.

ममता बॅनर्जी प्रमुख असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष आता पश्चिम बंगालच्या बाहेर पडत त्रिपुरा, गोव्यासह अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, त्यांनी इतर राज्यांमध्ये लढत राहावे. आता ममता बॅनर्जी यांना बी-टीम बनवण्यात आले आहे, मी यावर आक्षेप घेतला आहे. बी टीम असणे हा माझा टॅग आहे. पण आता काँग्रेस त्यांना भाजपाची बी-टीम म्हणत आहे. गोव्यात त्यांचा कसा सामना होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल, असे ओवेसी यांनी सांगितले.