माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत!

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याच्या कारणावरुन खोचक वक्तव्य केलं आहे. यामध्ये ते म्हणाले “मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावलाय.

मागच्या वेळा शिवेंद्रराजेंना अध्यक्ष करताना मी आणि रामराजे नाईक निंबाळकर वगैरे आम्ही सगळे होतो. पवार साहेबांकडे शिवेंद्रराजे भोसले यांची शिफारस आता जर मी असतो तर मी शिफारस करु शकतो. माझा पराभव झाल्यानं मुळं त्यांच्या शिफारसीला माझ्या सारख्याची शिफारस कमी पडली असेल, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं.

माझ्या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याची दखल राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींना घ्यावी लागली. परंतु ते करत असताना शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या कामाचं कौतुक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं आहे. आजपर्यंत या बँकेत शिवेंद्रराजे भोसलेंना जितका वेळ अध्यक्षपद दिलं तितका वेळ कुणाला मिळाला नसेल. त्यामुळं नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.