चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये ; नवाब मलिकांची खोचक टीका

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय. त्याचबरोबर पवारांबद्दल आदर असल्याचंच पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय. ‘ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं मलिक म्हणाले.

शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला, असं सांगतानाच त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलं.

पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहीशी संवाद साधताना ही कबुली दिली आहे. शरद पवार साहेबांबद्दल मी आदराने बोललेल्या क्लिपचा पेटारा भरेल. मी त्या त्या वेळेस पवारांबद्दल आदराने बोललो ते पण कुठे तरी कोट करा. सांगलीला एक घरगुती कार्यक्रम होता. सार्वजनिक नव्हता. कोणत्याही माणसाचं स्लिप ऑफ टंग होतं. तसंच माझं स्लिप ऑफ टंग एका क्षणापुरतं झालं. तुम्ही क्लिप पाहिली तर लक्षात येईल. हे भाषण केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असं पाटील म्हणाले.