शरद पवार यांच्या मेट्रो भेटीवर वादळ, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रतिउत्तर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोची पाहणी केली. पवारांनी यावेळी मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
आदरणीय पवार साहेबांनी मेट्रोची पाहणी केली म्हणून लगेच मेट्रोवर हक्कभंग आणण्याची भाषा? यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती? असो! स्व. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते….”छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता”, असं ट्वीट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केलीय.
आदरणीय पवार साहेबांनी मेट्रोची पाहणी केली म्हणून लगेच मेट्रोवर हक्कभंग आणण्याची भाषा? 🤔
यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?असो!
स्व. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते….
''छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.''— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 17, 2022
चंद्रकांत पाटलांची नेमकी टीका काय?
पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदाराला न कळवता, माननीय शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. पवारांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. ते राज्यसभा सदस्यही आहेत. पण अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं काय कारण? यातून श्रेयवादाची लढाई चाललीय का?
त्याचबरोबर ११ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. कंपनीला गॅरेंटी आणि इतर असा केंद्र सरकारने ८ हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. ३ हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ, असे ठरले होते. पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली?, असा सवालही पाटील यांनी केला.