पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुणे: पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मोहोळ यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचं प्रकरण भोवलंय. संबंधित शौचालय ठेकेदार असलेल्या भाचाच्या मदतीने तोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. कोथरूडमधील भीमनगर भागातील नागरिकांनी ही जागा सोडून जावं, यासाठी महापौरांनी हे शौचालय तोडलं.

मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या पत्नी जवपास 20 वर्षांपासून नगरसेवक पदावर आहेत. त्यांच्या वार्डातील हा प्रकार आहे. भीमनगरच्या नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतर करायला लावून त्या ठिकाणी एखादा गृहप्रकल्प सुरू करण्याचा मोहोळ यांचा प्लॅन असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या नागरिकांनी संबंधित प्रकरणात कोर्टात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात अनेक तांत्रिक बाबी अंतर्भूत आहेत. मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा, असं कोर्टाने म्हटलं. तसेच एका महिन्यात तपासाचे निष्कर्ष समोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आज दिवसभरात स्पष्टीकरण देणार आहेत. यानंतर त्यांची बाजू समोर येईल.