राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात, मौका सभी को मिलता है ; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा

मुंबई: महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे, सोबतच आम्हाला भाजप काही फार लांब नाही, आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ते नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, ”मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही. आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची.

तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत. येत्या काळात राज्याती अनेक महत्त्वाच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्येही आघाडी कायम राहिल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून  जुंपण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान एकीकडे आव्हाड यांनी गणेश नाईक प्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांचे कौतुक देखील केले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. हे पाच वर्ष तर आमचे सरकार स्थिर राहिलच, परंतु  2024 मध्ये देखील पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येईल.  तेव्हा देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असे शरद पवार यांनी मला खासगीत सांगितल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!