पुणे पुन्हा हादरले! भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या

पुणे: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हत्याकांडाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यामधील तळेगावमध्ये 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्याची घटना ताजी असताना  पुणे आणखी एका हत्येने हादरले आहे. एका तरुणाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा खून झाल्याची माहिती आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. नागेश सुभाष कराळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेलपिंपळगाव येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी वाहनांमधून आलेल्या तीन आरोपींनी नागेश कराळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला आहे. नागेश कराळे हे आपल्या वाहनात बसत असताना हे मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ चार ते पाच राऊंड फायर केले. गोळीबारात कराळेंचा जागीच मृत्यू झाला.

जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. मात्र ही हत्या कोणी केली, आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप अस्पष्टच आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तूलमधून गोळ्या झाडून हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थेट आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.