भाजपला सर्वात मोठा झटका, नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

43

मुंबई: शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालय कडून दिलासा न मिळाल्याने आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अटक टाळण्यासाठी आमदार नितेश राणेंना हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. सोबतच गोट्या सावंत यांचाही अटकपूर्व जामिन फेटाळला गेल्यामुळे त्यांच्याही अडचणींत वाढ झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नितेश राणे आणि गोट्या सावंत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन सुनावणीच्या युक्तिवादासाठी सरकारी पक्षातर्फे मुंबईहून दोन विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली होती. २८ डिसेंबर रोजी जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीशांसमोर झालेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या वतीने वकील संग्राम देसाई यांनी तर गोट्या सावंत यांच्या वतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला.

मात्र सरकारी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने काल दुपारी अटकपूर्व जामीन अर्जावरील उर्वरित कामकाज पार पडले. त्यानंतर अटकपूर्व जामिनावर आज ३० डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. यावर आज निर्णय देताना सरकारी वकिलांच्या म्हणण्यानंतर प्रधान सत्र न्यायाधीशांनी तपासात अडथळे निर्माण होऊ नये व मोबाइल हस्तगत करणे महत्वाचे असल्याने आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.