भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

34

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात येते आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती आशिष शेलार यांनी पोलिसांना केली आहे.

यापुर्वी एकदा 2020 मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापुर्वी आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा दहशतवाद्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार अँड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर आहे. याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह इतर ठिकाणाची दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेकडून रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रँच तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.