पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण: निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी

मुंबई: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेनं देशातील वातावरण ढवळून निघालं होतं. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले. तर दुसरीकडे हे प्रकरण न्यायालयात देखील पोहोचलं आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावर न्यायालयानेही पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी झाल्या असून, पंजाबनेसुद्धा मान्य केलंय असं सांगिलं आहे. तसंच याप्रकरणी न्यायालय चौकशीसाठी समिती नेमणार असं स्पष्ट केलं आहे.
पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. सुप्रीम कोर्ट सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करेल. याप्रकरणी लवकरच आदेश देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. त्याच वेळी, न्यायालयाने केंद्र आणि पंजाब या दोन्ही पक्षांना आपापल्या पॅनेलद्वारे तपासाला स्थगिती देण्यास सांगितले. यासोबतच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलं की, आता प्रश्न चौकशीचा आहे. सुप्रीम कोर्टाने ठामपणे सांगितलं की, “होय उल्लंघन झालं आहे आणि पंजाब सरकारनेही ते मान्य केलं आहे. जर चौकशी झाली तर त्याची व्याप्ती कुठपर्यंत असेल, हा प्रश्न आहे. तुम्हाला जर अधिकाऱ्यांवर कारवाईच करायची आहे तर आता यात न्यायालयाने पाहण्यासारखं काय उरलंय? तु्म्हीच आधी सगळं ठरवलंयत तर न्यायालयात कशाला आलात? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती देखील नेमली आहे.