वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका – आदित्य ठाकरे
मुंबई: कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दिनांक १७ जानेवारी २०२२) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री आदित्य ठाकरे याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले की, कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले, इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला.
आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही ठाकरे यांनी अखेरीस केले. दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.