मुंबईत दहावी-बारावीचे वर्ग सोडून सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार

6

मुंबई: मुंबईत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात सोमवार (दि.३) रोजी महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली.

महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना बीएमसी शिक्षण विभागाने केली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मार्च 2020 मध्ये राज्यातील शाळा बंद केल्यानंतर थेट 15 डिसेंबर 2021 रोजी पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या. परंतु आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता पाहता खबरदारी म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार मुंबईत होत आहे. जगभरातील प्रवाशांचे मुंबई शहरात येणे-जाणे होत असते. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू नये, असंही शिक्षण विभागाने म्हटलं आहे.मुंबईत 15 ते 18 वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण ठरलेल्या नियोजनानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ लसीकरणासाठी शाळेत बोलवता येईल असंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.