स्वत:हून लग्नापासून ते बाजारापर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा; महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन

11

मुंबई: कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचे सावट वेगळेच. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे कळकळीचं आवाहन केले. तसेच बाजार असो की लग्न… स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन महापौर पेडणेकर यांनी केलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. लग्न समारंभ झाले पाहिजे. पण ते नियमात होऊ द्या. गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित असे सोहळे करा. तसेच स्वत:हून लग्नापासून ते बाजारापर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असं आवाहन महापौर पेडणेकर यांनी केलं.

लॉकडाऊन असताच कामा नये. कारण आता सर्व सावरत आहेत. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये म्हणून सावध झालं पाहिजे. सुपर स्प्रेडर होऊ नका. मास्क लावा, वॉशेबल मास्क वापरला तरी चालेल. ती काळजी घेतली तर लॉकडाऊन लागणार नाही. कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. 20 हजाराचा आकडा येऊ देऊ नका. दुसरी लाट आपण थोपवून जिंकलो. आता ही लढाईही तुमच्या सहकार्याने जिंकायची आहे. आपण ही लढाई जिंकू शकतो. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात जनतेशी बोलतील, असं त्यांनी सांगितलं. शाळा बंद करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सांगतानाच इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.