आयसीसीकडून टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा; जाणून घ्या कधी आहे भारत विरुध्द पाकिस्तान सामना

13

मुंबई: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तानला स्पर्धेच्या ग्रुप २ मध्ये एकसाथ ठेवण्यात आले आहे आणि यासोबत या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका  आणि बांगलादेशच्या संघाना जागा मिळाली आहे. भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान  यांच्यामधील ऐतिहासिक सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. दरम्यान या बहुचर्चित टुर्नामेंटच्या सुरूवातीच्या ६ दिवशी म्हणजेच १६ ते २१ ऑक्टोबर पर्यंत टुर्नामेंटच्या पहिल्या फेरीतील सामने खेळवले जातील. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ टप्प्यातील सामने खेळवले जातील.

१६ ऑक्टोबरपासून आठव्या टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. स्पर्धेचे सामने ॲडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी खेळवले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. सुपर-१२ फेरी दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांना ग्रुप १ मध्ये स्थान मिळाले आहे. तर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांना ग्रुप २ मध्ये स्थान मिळाले आहे.

प्रत्येक ग्रुपमध्ये आणखी दोन संघाचा समावेश होईल. म्हणजेच चार संघांना सुपर १२ मध्ये प्रवेश मिळेल, जो पहिल्या फेरीतील त्यांच्या चांगल्या कामगिरीवर आधारित असेल. तसेच सुपर १२ चा पहिला सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून ४५ सामने खेळवले जाणार आहेत.

टी-२० विश्वचषकात भारताला ग्रुप-२ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबतच पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी ग्रुप १ च्या उपविजेत्या संघाशी खेळणार आहे. यानंतर ३० ऑक्टोबरला भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारत २ नोव्हेंबरला ॲडलेडच्या ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल. शेवटच्या टप्प्यात भारतीय संघ ६ नोव्हेंबर रोजी एमसीजी येथे ग्रुप बी मधील विजेत्या संघाशी सामना करेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.