उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष लढवणार

14

पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघातून दावेदारी केली होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत बाबुश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उत्पल पर्रिकर यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकवला असून, त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करिअरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले.

याबाबत माहिती देताना उत्पल पर्रिकर यांनी सांगितले की, मी विधानसभेच्या पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीमुळे गोवा विधानसभेच्या निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेनेही उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने पणजी मतदारसंघातही रंगतदार लढाई होण्याची शक्यता आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता, तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.