ऐसी मैत्री आणि मित्र होणे नाही..! दिलदार मित्र आमदार भरतशेठ गोगावले
आजकालच्या स्वार्थी जीवनात ‘त्याग’ हा शब्दचं नाहीसा झालाय आणि राजकारण्यांकडून याची अपेक्षा ठेवणे म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखे आहे, पण महाडचे आमदार व शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले याला अपवाद ठरलेत. मंत्री मंडळ विस्तार होत नाही, पुढे जात आहे आणि नक्की होणार कि नाही असे प्रश्न विरोधक तसेच प्रसारमाध्यमातून होत असताना अखेर मुहूर्त ठरला आणि क्रांति दिनाच्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी समारंभ झाला. मुख्यमंत्री हिंगोली – नांदेड दौरा आटपून रात्री उशिरा नंदनवनी पोहोचले आणि खरा दिवस तिकडे सुरु झाला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मंत्री असलेले व नसलेले आणि काही अपक्ष, आमदार शिंद साहेब नक्की कोणाला संधी देणार याची वाट पाहत होते. अपेक्षा तर सर्वांनाच होती पण हा विस्तार छोटया प्रमाणात ( मिनी ) होणार होता त्यामुळे शिंदे गटातील फक्त ९ जणांचा समावेश यामध्ये करण्यात येणार असल्याची खात्री लायक माहिती होती. मंत्री पदे सोडून आलेला एकही शिंदे समर्थक आमदार मागे हटण्याच्या तयारीत नव्हता तर अनेक जण आपण कसे योग्य आहोत आणि कसे सर्वात आधी सोबत आलो, निष्ठा – साथ वगैरे याची पुन्हा आठवण करून देत होते. काही जिल्ह्यातील एकाहून एक दिग्गज बाशिंग बांधून बसलेले असताना शिंदे साहेबांसोबत सावली सारखे उभे होते ते फक्त भरतशेठ..
भरतशेठ तसे एकनाथरावांचे अगदी सख्खे, दोघांमधील ट्युनिंग सर्वांनी वेळोवेळी पाहिलं आहे. तीन वेळा लोकांमधून निवडून येऊनही ठाकरे सरकारमध्ये डावलला गेलेला रायगडाचा शिलेदार दिलदार मनाचा आणि मैत्रीला जपणारा आपला माणूस म्हणजे भरतशेठ.. ज्या अर्थी शिंदे साहेबांनी भरतशेठला प्रतोद केलं त्याच वेळी अनेक जण अवाक होते, पण जेंव्हा विश्वासू व्यक्ती हवी असते तेव्हा साहजिकच आपल्या प्रामाणिक सहकारी मित्राला शिंदे साहेबांनी जवाबदारी दिली. गोगावले यांना तरी मंडळात स्थान असणारच यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. जशी घटिका सामीप येत होती तसे नंदनवन वरील तापमान वाढण्यास सुरवात झाली. संधी कोणाला नको ? पहिल्या झटक्यात मिळालं मंत्रिपद तर आणखी काय हवं ? कोर्टाच्या निकालाची तर धास्ती आहेच असे विचार अनेकांच्या मनात चालू असताना, मंत्रिपद सोडून सामील झालेल्या ६ जणांची नावे निश्चित करण्यात आली आणि खरी कसोटी तेथून पुढे चालू झाली. विशेष म्हणजे यामध्ये प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू यांचे नाव देखील नव्हते यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि काहींचा रक्तदाब कमी अधिक होऊ लागला.
आता ३ जणांना संधी द्यायची होती त्यात आपल्याला संधी मिळणे असणारच याची खात्री आणि विश्वास असताना देखील अनेक सहकारी इच्छुक आमदारांची अस्वस्थता पाहून आणि त्यामुळे आपल्या नेत्याला, मित्राला शिंदे साहेबांना संकटात सापडलेले फक्त मित्रानेच ओळखले आणि एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. माझा तुमच्यावर विश्वास आहेच, पण खात्री देखील आहे म्हणत माझं नाव राहू द्या, आपण योग्य त्याला साधी द्या म्हणत भरतशेठ यांनी आपल्या त्यागाचा आणि मित्रत्वाचा पुन्हा परिचय दिला. शिंदे साहेबांना देखील काय बोलले समजेना कदाचित त्यांना हि कुठला पर्याय उरला नव्हता पण मित्राने दाखविलेले औदार्य पाहून त्यांना नक्कीच कर्णाची आठवण झाली असेल यात शंका नाही.
मुंबई – सुरत – गुवाहाटी – गोवा – मुंबई प्रवासात सर्वांना सोबत घेऊन जाणारा, खऱ्या अर्थाने पात्रता असलेला, आपला सहकारी आमदार इतर सहकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसताना एक पाऊल मागे घेत संधी सोडतो आणि हसत मुखाने पुन्हा शपथ विधी सोहळ्याकडे प्रस्थान करतो हा क्षण बरेच काही सांगून गेला. आजचे राजकारण पाहता असे निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या देखील ठरू शकते हे माहित असताना देखील शिंदे साहेबांवरील आणि त्यांच्यातील मित्रावरील विश्वास हेच मनात ठेवत भरतशेठ पुढे चालत आहेत. त्यांना लोक आपुलकीने शेठ का म्हणतात ते पुन्हा अधोरेखित झालं आणि त्यांनी यावेळीही नेहमी प्रमाणे मन जिंकलं. म्हणूनच म्हणावं वाटतं “ऐसी मैत्री आणि मित्र होणे नाही..”