परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जर्मनीच्या शिष्टमंडळासमवेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी त्यांनी जर्मनीच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

सामंत म्हणाले की, जर्मनी आणि भारताचे द्विपक्षीय संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण असे राहिलेले आहेत. जर्मनी हा युरोपातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी असणारा देश आहे. भारताचे व्यापारी संबंध असलेल्या जगातील पहिल्या दहा देशांमध्ये जर्मनीचे नाव आहे.

सध्या भारतात १७०० पेक्षा जास्त जर्मन कंपन्या कार्यरत असून यातील ५०% कंपन्या महाराष्ट्रात आहेत. तसेच भारताच्या २१३ कंपन्या जर्मनीमध्ये कार्यरत आहेत. पुणे हे राज्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्रांपैकी एक असून जर्मन कंपन्यांचा प्राधान्यक्रम पुणे शहराला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले की, महाराष्ट्र आणि जर्मनीचे संबंध केवळ गुंतवणुकीपुरते मर्यादित नसून इंगोलस्ट्याड आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या दोन शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’ भागीदारी करार करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि स्टुटगार्ट हे दोन शहरे ट्विन सिटी म्हणून 1968 पासून ओळखली जातात.

भारत ही जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे अग्रेसर राज्य आहे. कोविडच्या आधी आणि नंतर संपूर्ण परकीय गुंतवणुकीपैकी केवळ जर्मनीचा महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा वाटा 40 ते 50% राहिला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

सामंत यांनी जर्मन कौन्सिलेट आणि इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे मनापासून आभार मानले.

यावेळी, बाडेन-व्युर्टेंबर्ग स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियन स्टेगमन, मेंबर ऑफ स्टेट पार्लमेंट टोबियस वोगट, सासचा बिंदर, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, जर्मनीच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी व सर्व संबंधित उपस्थित होते.

जर्मन शिष्टमंडळाचा मराठी पद्धतीने पाहुणचार

जर्मनीचे मंत्री डॉ. फ्लॉरेन स्टॅगमन, वूटनबर्गचे खासदार, महापौर यांच्यासह 30 जणांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांचे मुंबईत आगमन झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. मराठमोळ्या पद्धतीने शाल व फेटे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या भेटीत ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहेत. या दौऱ्यात काही गुंतवणूक करार होणार आहेत. उद्योग, व्यापार क्षेत्रात जर्मनीचे अनेक वर्षांपासून मैत्रिपूर्ण संबंध आहेत. या दौऱ्याने ते अधिक दृढ होतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!