रोजगार वाढीसाठी लहान उद्योजकांना प्रोत्साहन देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

जळगाव :  राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील असून जळगाव जिल्ह्यातही उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात आयोजित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चर आणि जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, उद्योजकता परिषदेचे सुधाकर देशमुख, संदीप भोळे, किरण बच्छाव, उपजिल्हाधिकारी किरण सावंत-पाटील, संगिता पाटील आदि उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून उद्योजकांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक एम.आय.डी.सी मध्ये स्वत:चे फायर स्टेशनबरोबरच कामगार रुग्णालय उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात नवीन 5 ठिकाणी एम.आय.डी.सी उभारण्यात येवून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य राहील. जिल्ह्यात केळीपासून धागा व कपडा निर्मिती करणारे उद्योग सुरु करण्याची तयारी काही उद्योजकांनी दर्शविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लहान, मोठे उद्योजक, व्यापारी तसेच समाजातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित काम केल्यास जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असेही ते म्हणाले.

आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, ललीत गांधी, महेंद्र रायसोनी यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना व उद्योगांना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींचा उहापोह केला. या अडचणी सोडविण्याची मागणीही त्यांनी केली. शेवटी आभार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी मानले.