ठाकरे सरकारला मोठे यश: राज्यात 5051 कोटींची गुंतवणूक, 9 हजार जणांना मिळणार नोकऱ्या!

मुंबई: दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून काल विविध 12 कंपन्यांसोबत सुमारे 5051 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते.

या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत एकूण 1.88  लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून 3 लाख 34 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले. काल झालेल्या 12 सामंजस्य करारातून राज्यात 9 हजारांपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्यांचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे.

त्यामुळे आज झालेल्या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश अग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे, असे देसाई म्हणाले.

या सामंजस्य कराराच्या निमित्ताने राज्यात धोरणात्मक गुंतवणूकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून, त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ही राज्याला मोठा दिलासा देणारी बातमी आहे.