मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर थेट टिळक वाड्यावर, काँग्रेसकडून भाजपला खिंडीत पकडण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी ?

पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उमेदवारी मिळेल अशी खात्री असतांना भाजपने मात्र हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जल्लोषात निघालेल्या भाजप नेत्यांना आणि उमेदवारालाही टिळक वाड्याचा विसर पडला यामुळे भाजप उमेदवाराने आपल्या पहिल्या पत्रकात व्यक्त केलेली टिळक कुटुंबाविषयीची आपुलकी आणि कृतज्ञता नक्की काय होती याचा प्रत्यय खूपच लवकर टिळक कुटुंबियांना आणि कसब्यातील नागरिकांना आला. पण उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हि बाब हेरली आणि यांनी टिळक वाड्याला भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं विशेष म्हणजे काँग्रेस नेते रोहित टिळक हे हि त्यांच्या सोबत उपस्थित होते. गणपती दर्शन झाल्यानंतर दिवंगत आमदार यांच्या निवास स्थानी भेट देत त्यांनी अभिवादन करत एका सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

भाजपने टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारलं, याचा भाजपला फटका बसणार – टिळक

काँग्रेसने या खेळीने भाजपला खिंडीत पकडण्याचा पहिला प्रयत्न केला. मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर थेट टिळक वाड्यावर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या. यावेळी काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी म्हटलं की, भाजप टिळक वाड्यात तिकीट देईल असं वाटत होतं, म्हणूनच मला पक्षाने विचारणा करूनही शांत राहिलो. पण भाजपने टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारलं, याचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपने ब्राह्मण समाजाला गृहित धरू नये, या नाराजीचा त्यांना फटका बसेल, मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून रवी धंगेकर यांच्या पाठिशी असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.

 

चिंचवड विधानसभेत वेगळा नियम

एकीकडे कसब्यात टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारताना चिंचवडमध्ये मात्र भाजपने स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.
यामुळे नक्की हा भाजपचा कोणता फॉर्म्युला आहे याबाबत जनतेच्याच मनात शंका निर्माण झाली आहे.