कृषी विज्ञान केंद्राला वनमंत्री यांची भेट…. शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता- मंत्री सुधीर मुनगंटीवार

9

बारामती : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह विविध उपक्रमांना वने, सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याची क्षमता आहे, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परीविक्षाधीन-तहसिलदार नेहा शिंदे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त रणजित पवार आदी उपस्थित होते.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले, आजही आपल्याकडे अधिक लोक शेतीवर उपजीविका करत आहेत. कृषि औजारे, उपकरणे नवीन तंत्रज्ञान पाहता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती क्षमता आहे. केव्हीके आणि ट्रस्टमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची प्रगती होण्यासाठी नक्कीच चालना मिळेल. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेती क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाची माहिती उपलब्ध होत आहे. कृषि विज्ञान केंद्रात नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन होत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी चंद्रपूरसह इतर ठिकाणीही येथील कृषि प्रदर्शनासारखी प्रदर्शने आयोजित करण्यात येतील.

इन्क्युबेशन व इनोव्हेशन केंद्राच्या माध्यमातून नवीन संशोधक तयार करण्याचे काम या ठिकाणी होत असल्यामुळे भविष्यात संशोधक तयार होतील आणि नवउद्योग (स्टार्टअप) सुरू करण्यासाठी त्यांना चालना मिळेल असे सांगून त्यांनी ॲग्रीकल्चर  ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.