अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीला रामराम… देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

नाशिक : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज प्रिया बेर्डे  यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. कोरोनाच्या जागतिक महामारीत त्यांनी अनेक गरजवंतांना मदत केली. परंतु त्यांनी अवघ्या दोन वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपात प्रवेश केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चित्रपट व‌‌ सांस्कृतिक विभाग, पुणे जिल्हा अध्यक्षा, असे पद त्यांच्याकडे होते.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यामागील कारण त्यांनी अद्याप  स्पष्ट केलेले नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पक्षीय कार्यकारिणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश केला. गिरीष  परदेशी, मधुरा जोशी, विद्याताई पोकळे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यासारख्या अनेकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रिया बेर्डे या मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. गेली अनेक वर्षे मराठी सिनेसृष्टीत त्या कार्यरत आहेत. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रिया बेर्डे या पत्नी आहेत. प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.