मनसेचा पाठींबा हेमंत रासने – अश्विनी जगताप  यांनाच; संभ्रम निर्माण करणाऱ्यांना मनसेचे सडेतोड उत्तर 

पुणे : कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे प्रचार करताना मनसेच्या कार्यालयात गेले होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र आता  मनसेने पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आलं आहे.

पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले.

मनसेचे स्पष्टीकरण 

घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे दोन मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये.