पौडच्या नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना : अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये; यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना अतिशय निंदनीय आहे. आज या घटनेच्या निषेधार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड असा मोर्चा काढण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाचे निवेदन प्रशासनाने स्विकारले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये; यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल, असे यावेळी पाटील यांनी आश्वस्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, मुळशी मध्ये दोन दिवसापूर्वी झालेली घटना इतकी भीषण आहे कि, त्यातून कोणाही सामान्य माणसाचं रक्त खवळून उठेल. त्यामुळेच आज प्रचंड मोर्चा निघालेला आहे. प्रशासनाने मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना बोलवून त्याबाबत निवेदन स्वीकारलेलं आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष घटना करणारा जो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील यांच्यावर अनेक कलम लावण्यात आली आहे. यासोबतच प्रशासन अशी खात्री देते कि, अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल. आणि ज्याने घटना घडवली आम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांना योग्य शासन होईल, असे पाटील यावेळी म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, आंदोलकांची एकच मागणी आहे, गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत. ते अतिशय धोकादायक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
पुण्यातील नागेश्वर मंदिरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची एका युवकाने विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने गावामध्ये सध्या संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.