तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : आता तरी सरकार म्हणून जागे व्हा,सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना धडा शिकवा – विजय वडेट्टीवार

287

पुणे : पुण्यात भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनात उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाकडून पैशांची अडवणूक केल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली. इतक्या असंवेदनशील लोकांची रुग्णालयात काम करण्याची पात्रता नाही. आता तरी सरकार म्हणून जागे व्हा,सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना धडा शिकवा, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार यांनी याप्रकरणी मत व्यक्त करताना म्हटले कि, पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला दाखल करून घेतले नाही त्यात एका आईचा मृत्यू झाला. मंत्रालयातून फोन जाऊन देखील जर रुग्णालय इतकी असंवेदनशीलता दाखवत असेल तर या रुग्णालयाला चाप लावण्याची वेळ आली आहे. आज भाजप आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर ही वेळ आली आहे,तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेत सुरू असलेला माज चव्हाट्यावर आला आहे. राज्यात दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असताना रुग्ण दगावत असेल तर सरकारचा काय धाक आहे हेच या रुग्णालयाने दाखवून दिले असल्याचे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, पुण्याचे मंगेशकर रुग्णालय हे सरकारने आपल्या ताब्यात घेण्याची वेळ आली आहे, या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. इतक्या असंवेदनशील लोकांची रुग्णालयात काम करण्याची पात्रता नाही. आता तरी सरकार म्हणून जागे व्हा,सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना धडा शिकवा, अशी प्रातिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.