तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : अशा असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा, एकाला कायद्याचा दणका बसला तर बाकीचे तरी सुधारतील, आमदार चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
पुणे : आज पुण्यात एक अतिशय संतापजनक घटना घडली. पुण्यात भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनात उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाकडून पैशांची अडवणूक केल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे मत भाजप आमदार चित्र वाघ यांनी व्यक्त केले.
दीनानाथ रुग्णालयाकडून झालेल्या हलगर्जीपणाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या कि, हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर होती आणि तिला जुळी मुलं होणार होती मात्र अचानक सातव्या महिन्यात तिला प्रसूती कळा सुरू झाल्या, म्हणून तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेले तर आधी १० लाख भरा मगच हॉस्पिटल मध्ये एडमिशन मिळेल असा पवित्रा तिथल्या निर्ढावलेल्या डॉक्टरांनी घेतला. हे पाहून तनिषाचे मनोबल खचले. ज्या डॉक्टरांनी धीर द्यायला हवा त्या डॉक्टरांनी थेट दुकानदारी दाखवली होती. मंत्रालयातून देखील मंगेशकर हॉस्पिटलला कॉल केला तरीही मुर्दाड मनाच्या डॉक्टरांना काही फरक पडला नाही. मनीषा प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत राहिली पण मेलेल्या मनाच्या डॉक्टरांना दिसत नव्हते. खरं तर आज एका आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जीवावर बेतलं सर्वसामान्य रुग्णांचे काय हाल करत असतील याचा विचार न केलेला बरा, असे वाघ यांनी म्हटले.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल मधून रुग्णांना असंवेदनशील आणि अमानवीय वागणूक मिळत असेल तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका आणि अशा असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा. एकाला कायद्याचा दणका बसला तर बाकीचे तरी सुधारतील, अशी तीव्र प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.