डॉ. यशवंत थोरात लिखित ‘काही वाटा काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितिज’ या दोन पुस्तकांचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर, २६ फेब्रुवारी : कोल्हापुरात डॉक्टर यशवंत थोरात लिखित ‘काही वाटा काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितिज’ या दोन पुस्तकांचं प्रकाशन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या पुस्तकांतून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. या चिंतनशील व्यक्तिमत्वाने येत्या काळातही लिहीत राहावे आणि त्यातून समाजाला दिशा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सध्याच्या काळात समाजाला अशा पुस्तकांची गरज असून राज्यातील सर्व ग्रंथालयांना डॉ. थोरात यांची पुस्तके भेट म्हणून दिली जातील, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राजर्षी शाहू स्मारक भवनात हा सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.
या वेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार व मान्यवर उपस्थित होते.