मराठी भाषेचे जतन करण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

11

मुबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी साहित्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कविता, नाटक, पोवाडे, गीते आदी विविध माध्यमांतून मराठी भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त झालेल्या तसेच अन्य साहित्यिकांच्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून राज्यात लागू करण्यात येत असून इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता मराठीत उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. मराठीतून अभ्यासक्रम शिकण्यासाठी यावर्षी 67 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामुळे केवळ इंग्रजीतूनच उच्च शिक्षण घेता येते हा प्रघात संपेल आणि मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी  यावेळी व्यक्त केला.

मराठी भाषेचे जतन करण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर दीक्षित, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.