दिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल समितीने तातडीने शासनाकडे सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : मंत्रालयात दिव्यांग विद्यापीठ निर्मिती संदर्भात बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीने दि.15 ऑगस्टपर्यत तातडीने अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा असे, निर्देश बैठकी दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापण्याच्या आवश्यक सोयीसुविधांचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने सविस्तर अहवाल १५ ऑगस्ट २०२४ पर्यत राज्य शासनाकडे तातडीने अहवाल सादर करावा, हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, त्यानंतर लवकरच स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार बच्चू कडू,आमदार प्रसाद लाड,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी समितीचे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.