मावळ तालुक्यातील चांदखेड येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पत्र वाटप

पुणे: आज पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात चांदखेड येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना पत्र वाटप करण्यात आले.

मावळ तालुक्यातील चांदखेड येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ व पत्र वाटप कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे १७ हजार घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुखकर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सभापती गुलाबराव माळसकर, राजाराम शिंदे, सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.