विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शैक्षणिक संस्थांमधील अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेण्याबाबत माहिती दिली.  देशभरातील विद्यार्थी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये (एबीसीआयडी) आपले खाते उघडत आहेत.आत्तापर्यंत देशातील १ हजार १६० शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेतला आहे.यात राज्यातील ११० शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशात सक्रिय असलेली पहिले चारही राज्याचे विद्यापीठ यात आघाडीवर राहिले आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे,  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाच्या दृष्टीने श्रेयांकासाठी (क्रेडिट) एक बँक तयार केली  जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या व्यवहारासाठी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट आहे. परीक्षेद्वारे दरवर्षी प्राप्त होणारे क्रेडिट या बँकेत साठवले जातील. विद्यार्थी अथवा शैक्षणिक संस्था पदवी बहाल करताना या क्रेडिटचा वापर करतील. दोन वेगवेगळ्या महाविद्यालयात जरी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले तरी क्रेडिट मात्र याच एबीसी आयडीवर जमा होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार जेव्हा क्रेडिट ट्रान्सफर करावे लागतील तेव्हा विद्यार्थ्यांना याचा फायदा  होईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणले.  संस्थेबाबत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, दुसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विद्यापीठ आहे. तर चौथ्या क्रमांकावर जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा क्रमांक आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संख्या पाहिली तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ५ लाख ४हजार ९३६ सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ ४ लाख ४५ हजार ४५३ मुंबई विद्यापीठ २ लाख १४ हजार ५६०, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ १ लाख १९हजार ९३६  एवढी आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत उच्च शिक्षण संचालक यांनी यासाठी कार्यशाळा, अभियान घेऊन विशेष मोहिम राबविली आणि जनजागृती केली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे, असे म्हणता येईल, असे  चंद्रकांत पाटील म्हणाले.