पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आमदार सुनील कांबळेंची माहिती
मुंबई : भाजप आमदार सुनील कांबळे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडली. पुणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, याकडे सुनील कांबळे यांनी लक्ष वेधले. या प्रश्नांवर उत्तर देताना पुणे शहरातील एस.आर.ए च्या अर्धवट प्रकल्पाची तपासणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.
सुनील कांबळे यांनी लक्षवेधी मांडत असताना म्हटले कि, पुणे शहरात काशेवाडी, मंगळवार पेठ, लोहिया नगर, ताडीवाला रोड, नाना पेठ इत्यादी ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम चालू आहेत. यापैकी बरेच प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प करणाऱ्या विकसकांचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधामुळे प्रत्यक्ष झोपडपट्टी धारकांची विकासकाकडून वेगवेगळ्या प्रकारे अडवणूक होत आहे व पात्र असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना सुद्धा घरापासून वंचित राहावे लागत आहे.
कांबळे पुढे म्हणाले कि, प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये सदर प्रकल्पावर देखरेख व तांत्रिक तपासणी करण्यासाठी स्वतःचे योग्य ते मनुष्यबळ नसल्यामुळे सदर प्रकल्पाच्या बांधकामाची तांत्रिक दृष्ट्या तपासणी होत नाही त्यामुळे बांधकाम योग्य होते की नाही हा प्रश्न निर्माण होतो.