पुणे- कोल्हापूर आणि पुणे- हुबळी वंदे भारत ट्रेन मुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते कोल्हापूर पट्ट्याला मोठा फायदा होणार – चंद्रकांत पाटील

22

पुणे : पुण्यातून सोमवारपासून पासून दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत असल्याची बाब अत्यंत आनंददायी आहे. पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवास आता अधिक वेगवान, आरामदायी, आणि सुखकारक होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने हिरवा झेंडा दाखवून पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, ही रेल्वेच्या महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक घटना आहे. पुणे- कोल्हापूर आणि पुणे- हुबळी वंदे भारत ट्रेन मुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते कोल्हापूर पट्ट्याला मोठा फायदा होणार आहे. या पट्ट्यात प्रचंड सहकारी चळवळ, उद्योग, शैक्षणिक संस्था असल्यामुळे एकाच दिवसात कोल्हापूरहून पुणे आणि पुण्याहून कोल्हापूर असे कामकाज करुन परत येणे शक्य होणार आहे. चांगला वेग, दिसायला आकर्षक, प्रवाशांना प्रवासाचा आनंद देणारी आणि उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ असलेली ही रेल्वे आहे, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरुन विमानसेवा सुरू झाली आहे. आता लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेच्या पुढील टप्प्याचा शुभारंभ होत आहे. हे पाहता पुणे शहरात दळणवळण आणि प्रवासासाठी चांगल्या सेवा निर्माण होत आहेत, असेही पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला पुणे- हुबळी, पुणे- कोल्हापूर आणि नागपूर सिकंदराबाद या तीन वंदे भारत रेल्वेची भेट दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे. ही भारताने स्वत: आपल्या देशात तयार केलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी मत व्यक्त करताना म्हटले, देशामध्ये १६ वंदे मातरम ट्रेनचे लोकार्पण होत असताना महाराष्ट्रात तीन आणि पुण्यातून दोन ट्रेन सुरू होत असल्याची पुणे शहरासाठी आनंदाची बाब आहे. गेल्या दहा वर्षात रेल्वेच्या विकासासाठी २३ लाख ६४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये नवीन रेल्वे स्थानकांची कामे, अमृत योजना, आदर्श रेल्वे स्थानक आदी अनेक कामे सुरू असून जवळपास १ हजार ६४ स्थानकांचा कायापालट त्यांच्या नवीनीकरणाच्या कामातून होत आहे, असेही ते म्हणाले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.