शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले, भाजपची खरी ताकद फार कमी आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक समाजघटकाचा पक्ष आहे. त्या सर्व समाजघटकांपर्यंत पोहचणे हे आपले काम आहे. एका महिन्यात बुथ कमिट्या पूर्ण करा. आपण चांगल्याप्रकारे संघटना राबवली तर यश हे आपलेच आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथील कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केला. सामान्य जनतेच्या समस्या अजून सरकार सोडवू शकलेलं नाही. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत आपल्या बुथ कमिट्यांच्या माध्यमातून पोहचवा. आपल्या बुथ कमिट्यांमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती, दलित, अल्पसंख्याक या सर्व समाजघटकांना सामावून घ्या, असे जयंत पाटील म्हणाले.
शिवसेना ही भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात आहेत. महाविकास आघाडी म्हणून आपण मिळून भाजपला पराभूत करू, असे ते म्हणाले.
मागील निवडणुकांमध्ये आपल्याला अनुभव आला की ज्या ठिकाणी बुथ कमिट्या पूर्ण झाल्या होत्या तिथे आपला निकाल चांगला होता. आपण मतदारांपर्यंत पोहचायला हवे. समोरच्या बाजूकडे शक्ती आहे, धन आहे याचा विचार करू नका. लक्षात ठेवा युक्ती ही कोणत्याही शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते. युक्तीचा वापर करून जनतेला आपल्याकडे वळवा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
सरकारमधील लोक आता निवडणुका आहेत म्हणून बऱ्याच योजनांच्या घोषणा करतील. पण प्रत्यक्षात काम दिसणार नाही. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. राज्यात जे वातावरण आहे ते लोकांना पटलेले नाही. लोकांना प्रलोभने दाखवली जात आहेत पण लोक सजग झाले आहेत. त्यामुळे आपण लोकांना सक्षम पर्याय दिला पाहिजे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!