स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून शिकावं – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बापट हे मागील दीड वर्षांपासून पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बापट साहेबांचे शेवटचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बापट साहेबांच्या काही आठवणी सांगितल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आमचे मार्गदर्शक गिरीशजी बापट यांचा स्वभाव ठाम आणि नम्र होता. राजकारणासोबत स्वयंपाकात सुद्धा त्यांची तितकीच गोडी होती. बापट साहेबांची उणिव भरून काढणे कठीण आहे. आपणा सर्वांनाच माहिती आहे कि बापट साहेबांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवायला वाढायची खूप मजा यायची, खूप आनंद यायचा. २००८ ला मी आमदार झाल्यानंतर नेहमीच ते मला म्हणायचे कि आज संध्याकाळी घरी जेवायला ये. आम्हाला तर चहाही करता येत नाही. आम्ही त्यांच्या स्वयंपाक करण्याची वाट बघत बसलेलो असायचो. हेच अधिवेशनामध्ये आधी विरोधी पक्षात असताना मग सत्ता असतांना लॉबीमध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असायची. अधिवेशन जर उशीर पर्यंत चालू राहील तर लोक म्हणायची बापट साहेब काळजी घ्यायला आहेत.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, मी नेहमी असं म्हणतो कि, मी ठाम आहे आणि मी नम्र आहे हे बापट साहेबांकडून शिकावं. त्यांनी कधीही त्यांचं तत्व सोडलं नाही. सगळ्यांसोबत प्रेमाची वागणूक असायची. समोरच्याची समजूत घालण्यात माहीर होते, पण म्हणून समोरच्याच म्हणणं स्वतःवर त्यांनी कधी लादून घेतलं नाही. बापट साहेबांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पार्टीची सेवा केली, असे पाटील म्हणाले.