जायका सारखा प्रकल्प शेती आणि उद्योगांच्या पाण्याची गरज भागवेल, चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

5

पुणे : पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचे आणि सांडपाण्याचे परिपूर्ण नियोजन आवश्यक आहे. जायका सारखा प्रकल्प शेती आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम पर्याय ठरणार असल्याचा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंन्द्राच्या कामास भेट देऊन पाहणी केली.

प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे व सांडपाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या पुनरुपयोगाबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, शहरामधील वेगवेगळ्या प्रश्नांना कायमचा न्याय देण्यासाठी खूप मोठं मोठे प्रोजेक्ट सुरु आहेत. जसे शुद्ध पिण्याचे पाणी यासाठी २४ * ७ सुरु आहे. तसाच हा जायका प्रोजेक्ट सांडपाणी शुद्धीकरण आणि ते किमान शेतीला आणि इंडस्ट्रीला वापरण्यायोग्य करणं याचे काही नवे पॅरामीटर्स आले आहेत. हा जवळपास १२०० कोटींचा प्रोजेक्ट आहे त्यापैकी ८०० कोटी हे केंद्र सरकार अनुदान म्हणून देणार आहे, जे रिफंडेबल नाहीय, असे पाटील यांनी सांगितले.

या सगळ्याच प्रोजेक्टचा म्हणजे नदी सुधारणा प्रकल्प असेल ज्यातून खूप सुंदर काठ तयार होतील. याबाबत मी आता बैठका घेतल्या आहेत. आता फिल्डवर जाऊन त्याची माहिती घेत आहे. हे सगळं त्या दिशेने चालले आहे ना ? त्यात काही त्रुटी तर नाहीत ना? जायकाचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असेल तो इथे असेल. तिथं भेट देऊन मी आज त्याची माहिती घेतली असल्याचे पाटील म्हणाले.

या प्रकल्पाची क्षमता १२७ द.ल. लिटर प्रतिदिन असून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे. ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीज खर्चात बचत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून २०२५ अखेरपर्यंत नदीत प्रक्रीया केलेले पाणीच सोडण्यात येईल. प्रकल्पातून तयार होणाऱ्या पाण्याचा उद्योगासाठीदेखील वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.