गिरीशजी सदैव पुणेकरांच्या हृदयात एक आदर्श म्हणून कायम राहतील – चंद्रकांत पाटील
पुणे : भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी आपली ओळख निर्माण करणारे बापट यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे शहरातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे दिवंगत खासदार आणि मार्गदर्शक गिरीशजी बापट यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून सहसंवेदना व्यक्त केल्या. गिरीशजी सदैव पुणेकरांच्या हृदयात एक आदर्श म्हणून कायम राहतील, अशा भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. गिरीश बापट यांचे गेली अनेक वर्ष पुण्यातील राजकारणात दबदबा होता. नुकत्याच झालेल्या कसबा निवडणुकीत आजारी असताना देखील त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यांचं आपल्या पक्षाशी असणार एकनिष्ठतेच नातं यावेळी दिसून आलं. समाजकार्य आणि विकासाचं राजकारण त्यांनी केलं. पुणेकरांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळालं. पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार , मंत्री, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता.