कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण – चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘कमवा आणि शिका’ योजनेचा शुभारंभ

पुणे : यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ‘कमवा आणि शिका योजना’ राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल आणि त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव या योजनेला देण्याचा मानस आहे. यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे आयोजित ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे. देशात पाश्चात्य देशांच्या तुलनेत संशोधनाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याची गरज आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

शासनाने कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेतला. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापासून कौशल्य विकासाला चार क्रेडीट पॉइंट ठेवण्यात येणार असून ते पदवी मिळविण्यासाठी बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक घेऊन अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी आठव्या संशोधन पुस्तिकेचे आणि न्यूज लेटरच्या पुणे चॅप्टर १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राजेश टोपे, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, यशस्वी ग्रुपचे चेअरमन विश्वेश कुलकर्णी, प्रतापराव पवार, राजेश पांडे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापन सल्लागार गजेंद्र चंदेल आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!