चंद्रकांत पाटीलांनी केले वासुदेव फडके यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन, ‘त्या’ कारागृहाचा पीएमपीच्या पुणे दर्शनमध्ये समावेश करण्याची दिली ग्वाही

पुणे : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत तयार झालेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांना अक्षरशः जेरीस आणले. केवळ फंदफितुरीमुळे त्यांना ब्रिटिंशांनी पकडून, पुण्यातील आताच्या सीआयडी कार्यालय येथे ठेवले. या तुरुंगवासातही ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या अनन्वित अत्याचार केले. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडल्याने एडन येथील कारावासातच त्यांचा मृत्यू झाला.
आज वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला समजावे यासाठी वासुदेव फडके ज्या कारागृहात होते, त्याचे लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने वासुदेव फडके यांचे जीवनचरित्र इथे साकारण्यात आले आहे. या सर्व सुशोभीकरणाच्या कामाचे काल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी त्यांनी वासुदेव फडके यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. तसेच, या स्थानाचा पीएमपीच्या पुणे दर्शनमध्ये समावेश होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.