पुणे : प्रतिभावंत गायक व संगीतकार पंडित यादवराज फड यांच्या षष्ठ्यबद्यपूर्ती निमित्त पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटले कि, पंडितजींसारख्या संगीत साधकाने प्रदीर्घ काळ संगीताची सेवा केली. वारकरी संप्रदायात माणसांमध्ये ईश्वरानुभूती घेतली जाते. त्यामुळे ही परंपरा जगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी वारकऱ्यांना श्रीक्षेत्र आळंदीमध्ये १०० खोल्यांचं वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले.
यावेळी महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड आणि पंडित यादवराज फड यांना रामजन्मभूमीची पवित्र माती, चौपाई आणि अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. तसेच पंडितजींना आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नवोदित गायकांना संगीत साधनेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.