पुणे : सद्या सर्वत्र दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असताना; समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून विविध कारणांनी दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी; यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती काम करत असतात. अशा संस्थांना मदत करणं आणि प्रोत्साहन देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आपली जबाबदारी समजतात.
दरवर्षी दिवाळी वंचित अशा घटकांसोबत साजरी करण्याचा माझा संकल्प असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले . यंदाही या संकल्पानुसार आज पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील वंचित घटकातील मुलांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली.
नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या माध्यमातून गुरुकुलम् मधील वंचित मुलांना नवीन ड्रेस वाटप करण्यात आले. यावेळी लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा दिवाळीच्या आनंदात भर घालणारा ठरला. यावेळी दिवाळी निमित्त विश्वकर्मा बांधवांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करुन, चंद्रकांत पाटील यांनी त्यांनाही प्रोत्साहित केले.