राज्य सरकारच्या धोरणावर समाधान व्यक्त करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

26
मुंबई : वस्त्रोद्योग क्षेत्रातील काही मान्यवरांनी मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यात वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बळकटीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांच्या उत्थानासाठी शासन प्रयत्नशील आहे. सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून प्रतिचाती रु. ५ हजार प्रमाणे ५ वर्षांसाठी घेणाऱ्या मध्यम मुदती कर्जावर (दोन वर्षाच्या मोराटोरिअम कालावधीसह) कमाल १२% पर्यंतचे व्याज प्रदान करण्याच्या योजनेस मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने नुकताच निर्गमित केला आहे.
वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक स्तुत्य निर्णय घेतले आहे. ते म्हणजे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून देण्याच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेस मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे.
सरकारने घेतलेल्या अशा अनेक निर्णयांवर वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या मान्यवरांनी आपले आभार प्रकट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.