‘कॅप्टिव्ह मार्केट या योजनेला अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

22

मुंबई : मंत्रालयात वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग यांचे एकत्रित कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप नियोजन बाबत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्तितीत आढावा बैठक घेण्यात आली. वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेला अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे अशा सूचना पाटील यांनी याप्रसंगी केल्या.

ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली असून  राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ जवळपास २४ लाख ८० हजार ३८० कुटुबांना होणार आहे.

कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप होणार आहे. त्याचे वस्त्रोद्योग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी कालबद्ध नियोजन करून १ फेब्रुवारी २०२४ पासून साडी वाटप सुरू होईल आणि सर्वांना लाभ मिळेल, असे जिल्हानिहाय नियोजन करावे, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर, उपसचिव श्री. कृष्ण पवार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.