इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान आणि रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वागत

पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी वस्त्रोद्योग धोरण 2018-23 मधील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. याचा फायदा ४०० उद्योगांना होणार आहे.
राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 ISDSI ही योजना 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर मोहिमही राबविण्यात आली आहे.